परभणी

Parbhani news | वाळू माफियांनी खोदलेला 'मृत्यूचा सापळा'; गोदावरीत बुडून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या करण्यात आलेल्या वाळू उपशाचा विळखा आता एका निष्पाप तरुणाचा जीव घेऊनच सुटला. नदीपात्रातील धोकादायक खड्ड्यांचा अंदाज न आल्याने शहरातील धनगर गल्लीत राहणाऱ्या १९ वर्षीय राधाजी बळीराम शिंदे या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, राधाजी गुरुवारी (दि. १८) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसोबत गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. यावेळी पाण्यात पोहत असताना अचानक एका खोल खड्ड्यात गेल्याने त्याचा तोल गेला आणि तो त्यात अडकला. मदतीसाठी आरडाओरडा होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत शोधमोहीम राबवली आणि त्याला बाहेर काढले. त्याला तत्काळ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

शहरात हळहळ

शवविच्छेदनानंतर राधाजीचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी गोदावरीकाठी असलेल्या स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राधाजीच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. एकुलत्या एका मुलाच्या निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशासनावर रोष

नदीपात्रातील अनधिकृत वाळू उपशामुळे निर्माण झालेले हे खोल खड्डे आता 'मृत्यूचे सापळे' ठरत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच वाळू माफियांचे धाडस वाढले असून, त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. तरीही आता तरी प्रशासनाने खडबडून जागे होऊन तातडीने नदीपात्रातील धोकादायक खड्डे बुजवावेत आणि ठिकाणी इशारा फलक लावून सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी नागरिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT