Parbhani Women united for alcohol prohibition
परभणी, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सिंगणापूर व सिंगणापूर फाटा येथे उघडपणे होत असलेली अवैध दारु विक्री तात्काळ बंद करण्यासाठी महिला एकवटल्या असुन गुरूवारी (दि.२२) प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलींग बोधने यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांची भेट घेत दारु बंदीची मागणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांचा सन्मान करण्याचे सोडत त्यांनाच उलट प्रश्नांची सरबत्ती केल्याचा आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष बोधने यांनी केला.
सिंगणापूर येथील महिला - सरपंचासह पोलीस पाटील व - जवळपास ४५ महिलांनी सिंगणापूर व सिंगणापूर फाटा येथील अवैधरित्या - होणारी दारू विक्री बंद करावी या - मागणीसाठी अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या कक्षात परभणी ग्रामीणचे - पोलीस उपविभागीय अधिकारी देशमुख यांची भेट घेत निवेदन सादर केले. सिंगणापूर फाटा व सिंगणापूर - गावात होत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण व अल्पवयीन मुलांना दारुचे व्यसन लागले आहे. अनेकवेळा महिलांनी तक्रारी करूनही अवैध दारू विक्री बंद होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पानठेले, छोटी मोठी दुकाने, ढाबे व खाजगी व्यक्तीकडून अवैधरीत्या उघड उघड दारू विक्री केली जात आहे. गावात दारु उपलब्ध होत असल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले असुन महिलांना मारहाण करणे, रस्त्यावर भांडणे करणे प्रकार वाढले असुन यामुळे शाळकरी मुलांसह महिला, मुलींना त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांनी तक्रारदार महिलांवरच प्रश्नांची सरबत्ती केली. दारूविक्रेत्यांची नावे सांगा, त्यांचे मोबाईल नंबर द्या, आम्ही तुमच्या घरी आल्यानंतर दारू विक्रेत्यांची घरे दाखवा असे उलट प्रश्न परभणी ग्रामीणचे पोलिस उपविभागीय अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी केल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी केला आहे. सिंगणापूर येथील दारूबंदी प्रश्नी लवकरच पोलिस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांची भेट घेणार असल्याचे बोधने यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.