Parbhani Vasmat Road Truck Tipper Fire Pudhari
परभणी

Parbhani Accident | परभणी-वसमत रोडवर जोराच्या धडकेत ट्रक - टिप्पर जळून खाक; दोन्ही चालक जखमी

वाहनांमधून आगीच्या मोठ्या ज्वाळा उठत असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Vasmat Road Truck Tipper Fire

परभणी : परभणी-वसमत रोडवरील त्रिधारा पाटी पुलाजवळ सिमेंटने भरलेला ट्रक आणि टिप्पर यांच्यात बुधवारी (दि. २६) पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने काही वेळातच ती पूर्णपणे जळून खाक झाली. वाहनांमधून आगीच्या मोठ्या ज्वाळा उठत असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान राखून दोन्ही वाहनांतील चालकांना वेळीच बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली.

या अपघातात ट्रकचालक रमेश कांबळे आणि टिप्परचालक किशोर जाधव हे दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर परभणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुलावर दोन्ही वाहनांची जोरदार धडक

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३४ बीझेड १८९७ क्रमांकाचा ट्रक सिमेंट घेऊन परभणीच्या दिशेने येत होता. त्याचवेळी एमएच ४३ यू ७६०८ क्रमांकाचा टिप्पर राहटीच्या दिशेने जात होता. त्रिधारा पाटीजवळील पुलावर दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

धडकेनंतर काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. दरम्यान, त्रिधारा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास हा अपघात आला. वाहनांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

आगीचा भडका वाढण्यापूर्वी चालकांना बाहेर काढले

दोन्ही वाहनांमध्ये चालक अडकले असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीचा भडका वाढण्यापूर्वीच दोन्ही चालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी परभणीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुदैवाने या अपघातात अन्य कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीच्या तीव्रतेमुळे दोन्ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली.

अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण

घटनेची माहिती मिळताच परभणी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे, फायरमन निखिल बेंडसुरे, मदन जाधव, अखिल अहमद तसेच वाहनचालक वसीम यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचे काम सुरू केले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात जळाली.

वाहतुकीवर काही काळ परिणाम

अपघातानंतर जळालेली वाहने रस्त्यावरच असल्याने वसमत रोडवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. पहाटेच्या वेळी पुलाजवळ घडलेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT