पूर्णेत दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे Pudhari
परभणी

Ajit Pawar Tributes | पूर्णेत दिवंगत अजितदादांना ठिकठिकाणी श्रद्धांजली; जिल्हा परिषद प्रचारास तूर्तास स्थगिती

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Purna Tributes Ajit Pawar

पूर्णा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे मंगळवार, दि. २८ रोजी सकाळी विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. सुरुवातीला प्रसारमाध्यमांवर झळकलेली “अजितदादा गेले” ही बातमी अनेकांना अफवा वाटत होती. मात्र काही वेळातच मुंबईहून निघालेले विमान बारामती परिसरात लँडिंगदरम्यान कोसळून स्फोट झाल्याची आणि या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह अन्य सहा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली.

ही धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार काळात ही दुर्दैवी घटना घडल्याने राजकीय वातावरणावरही शोककळा पसरली आहे.

राज्य शासनाने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केल्यामुळे पूर्णा तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली. शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी फलक लावून शोकसभा घेण्यात आल्या असून दिवंगत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

दि. २९ रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरणात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रसंग दूरचित्रवाणीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. अखेरच्या मानवंदनेवेळी उपस्थितांचे तसेच पाहणाऱ्यांचे अश्रू अनावर झाल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांतील नेते, कार्यकर्ते, शेतकरी व सामान्य जनतेशी आपुलकीने संवाद साधणारे अजित पवार यांच्या जाण्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा भक्कम आधार हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराला तूर्तास ब्रेक

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांनी आपला प्रचार तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वत्र शोकमय वातावरण असून नागरिकांचे चेहरे काळवंडलेले दिसत आहेत.

अजित पवार यांचा सहवास लाभलेल्या शहाजी देसाई, रितेश काळे, विशाल कदम, श्रीधर पारवे, डिगंबर क-हाळे, प्रकाश ढोणे, जाकीर कुरेशी, हाजी कुरेशी यांच्यासह अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT