Jaggery Factory Pollution Pudhari
परभणी

Jaggery Factory Pollution | ताडकळस जवळील गुळ कारखान्यात चप्पल–बूट जाळून इंधनाचा वापर; काळ्या धुरामुळे गंभीर प्रदूषण

Parbhani Pollution | अनेक हानिकारक वायू उत्सर्जित; मनुष्य, प्राणी, पिकांवर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Jaggery Factory Pollution

ताडकळस : ताडकळस (ता. पूर्णा) गावा शेजारीच ताडकळस ते पालम राज्य महामार्ग जवळच असलेल्या गुळ कारखान्यात भट्टीसाठी चक्क चप्पल बुटाचा वापर करत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात काळ्याकुट्ट धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. यातून अत्यंत हानिकारक असे वायु उत्सर्जित होत आहेत.जे मनुष्य, प्राणी , शेतीचे उत्पादन, जमिनीचा पोत , परागीकरण करणारे किटक या सर्व घटकांवर दुष्परिणाम करू शकतात.

ताडकळस ते पालम राज्य महामार्गाजवळ काही वर्षांपासून ऊसापासुन गुळ तयार करण्याचा कारखाना सुरू आहे. सुरवातीला येथे भट्टीला जाळण म्हणून ऊस बगॅस ( उसातून रस काढल्यानंतर राहिलेला चोथा) चा वापर होत होता. गतवर्षीपासून माञ येथे जुने-पुराणे चप्पल, बुट एखाद्या डंपिंग ग्राऊंड वरूण ट्रकद्वारे आणून जळण म्हणून वापरले जात आहेत. यातून परिसरात काळ्या धुराचे लोट सर्वञ पसरलेले दिसतात. यातून कार्बन मोनॉक्साइड, कार्बनडाय ऑक्साईड, सल्फरडॉय ऑक्साईड असे विविध हानिकारक वायू, धुराचे घटक राखेचे कण बाहेर पडतात.

हेच कण तयार होत असलेल्या उसाच्या रसात, पाकात, थेट मिसळल्यामुळे गुळ देखील निकृष्ट दर्जाचा तयार होतो. उत्सर्जित होणाऱ्या वायू व धुरातील घटकांची दुष्परिणाम करण्याची तीव्रता 50 मिटर पर्यंत असू शकते. तर वार्‍याच्या दिशेने हा धुर व यातून बाहेर पडणारे वायू दोन कि.मी. पर्यंत परिणाम करू शकतात. तसेच धुरातील सुक्ष्म कण हे कारखाना परिसरात 10 कि.मी.अंतरावर देखील वातावरणात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या वायुमुळे तेथील कामगार अथवा जवळ वावरणाऱ्या व्यक्तींच्या श्वसनसंस्थेचे नुकसान होवू शकते, कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका, चक्कर येणे, थकवा आदी व्याधी जडतात. तर एक कि.मी. परिसरातील लोकांना खोकला, त्वचेला अलर्जी, डोळे जळजळणे असे परिणाम जाणवतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच जनावरांची दूध देण्याची क्षमता घटत जाते. धुराच्या कणात कॅडमियम, क्रोमियम सारखे घातक धातू वातावरणात पसरल्यामुळे जवळपासच्या उभ्या पिकांवर परिणाम होतोच पण जमिनीची सुपिकता देखील कमी होते.

जमिनीचा पोत खराब झाल्यामुळे उत्पादन वर्षानुवर्ष कमी होत जाण्याची भीती आहे. या विषारी वायूमुळे फळबागेसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या परागीकरण करणाऱ्यां किटकांना देखील हानी पोहचते. मोठ्या शहरात विविध कंपन्या, असंख्य वाहणे यामुळे प्रदुषणाची समस्या गंभीर होत आहे. तेथील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत असून शहरी जनता चांगल्या आरोग्यासाठी ग्रामीण भागाकडे आशेने पाहत असताना मात्र खेडुतांना देखील आता वाढत्या AQI ( एअर क्वलिटी इंडेक्स) ला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT