Parbhani Swabhimani's Zilla Parishad andolan
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर, गाय गोटा, घरकुल अशी अनेक कामे पंचायत समिती अंतर्गत पूर्ण केले, परंतु बिल न काढताच अधिकारी मात्र २०२४ पर्यंतचे बिल अदा केले असे सांगत आहेत. या बनवाबनवीमुळे गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलक कार्यकर्त्यांना नानलपेठ पोलिसांनी अटक करून सायंकाळी सुटका केली.
शेतकऱ्यांच्या विहिरी २०२१ ते २०२४ या वर्षांमध्ये पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांनी कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही अद्याप शेतकऱ्याना विहिरीचे बिल मिळालेली नाही. हे बिल का मिळाले नाही असा सवाल करत स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी रोहयोचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी घोन्सीकर यांना घेरावा घालून जाब विचारला. जोपर्यंत शेतकऱ्यांची बिले खात्यात जमा होत नाहीत तोपर्यंत आम्ही या कार्यालयामधून उठणार नाहीत अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी घेत अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. शेतकऱ्यांची पिळवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
याकडे प्रशासन अद्यापही लक्ष द्यायला तयार नाही. पंचायत समितीचे अधिकारी फाईल मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी करत आहेत, असा सवाल शेतकरी या ठिकाणी उपस्थित करत होते, पण उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या विषयावर मौन बाळगले, शेतकऱ्यांना त्रास दिला तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ असा इशारा देत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालय दणाणून सोडले. यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, नागेश दुधाटे, राम दुधाटे, मुंजाभाऊ लोंढे, हनुमान चांगभले, विष्णू दुधाटे, उद्ध बराव जंबजाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकीकडे विहिरीचे खोदकाम करूनही अद्यापही शेतकऱ्यांच्या नावे बिल पडत नसल्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत. पण दुसरीकडे रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर असून विहिरीचे खोदकाम न करताच विहिरीचे बोगस बिल भोगाव येथील संजीवनी जीवनराव साबळे यांच्या नावे उचलण्यात आले. हे बिल शेतकऱ्यांच्या माघारी उचलून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. लाभाथ्यांनी कार्यालयाचे खेटे मारूनही दोषींवर अद्यापही कोणती कारवाई झालेली नाही, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यावर प्रशासन का दिरंगाई करत आहे हा सवाल लाभार्थी करत आहे.