Parbhani Sugarcane farmers' protest escalates
सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सायखेडा येथील व्टेंन्टीवन शुगर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले आहे. कारखाना अशासनाकडून मागणी मान्य न झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश केला.
शेतकऱ्यांची मुख्य मागणीत यावर्षीची पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये देण्याची तसेच गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसासाठी प्रतिटन २,७०० रुपये देण्याची होती. व्याशिवाय कारखान्यामुळे परिसरातील प्रदू षणावर नियंत्रण ठेवण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी रविवार (दि.१) पासून कारखाना परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले. सकाळपासून सहा तासांपेक्षा अधिक काळ कारखाना प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पावले उचलली आणि कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश केला.
यावेळी त्यांनी कारखान्याचे सर्वेसर्वा आ. अमित देशमुख यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात चर्चा झाली, पण प्रशासनाने मागणीप्रमाणे पैसे देण्यात असमर्थता दर्शविल्यामुळे चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे चालू ठेवून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
आंदोलनात किसान सभेचे डॉ. अजित नवले, राज्याध्यक्ष उमेश देशमुख, अॅड. माधुरी क्षीरसागर, किशोर ढगे, अजय बुरांडे, लक्ष्मण पौळ, बालाजी कडभाने, विश्वंभर गोरवे, हेमचंद्र शिंदे, शिवाजी कदम, श्रीराम बडे, ओंकार पवार, वसंत राठोड, दीपक लिपी, दत्ता गव्हाणे, सुदाम शिंदे, सुधीर बिंदू, गणेश पाटील, रामेश्वर मोकाशे, सुरेश इखे, ऋषीकेश जोगदंड, भगवान जोगदंड यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. स्थानिकांनी ही घटना गंभीर मानली असून या आंदोलनामुळे परिसरातील शांती व वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.