Power Outage Manvat Pudhari
परभणी

Parbhani News | खंडित वीज पुरवठ्यावरून महावितरण - खदानचालक आमनेसामने: दोघांकडून तहसीलदारांकडे कारवाईची मागणी

स्फोटामुळे ३३ केव्ही विद्युत वाहिन्यांवर दगड पडून वीजपुरवठा खंडित

पुढारी वृत्तसेवा

Power Outage Manvat
मानवत : दगड खाणीत झालेल्या स्फोटामुळे मानवत शहरासह चार उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सुमारे १८ गावांचा वीजपुरवठा तब्बल सहा तास खंडित झाला. या घटनेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. प्रसारमाध्यमांत बातम्या झळकल्यानंतर या प्रकरणी खदानचालक आणि महावितरण यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, दोन्ही बाजूंनी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याकडे कारवाईची मागणी करत निवेदने सादर केली आहेत.

११ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे साडेसहा ते सातच्या दरम्यान तहसील व प्रशासकीय इमारतीजवळील दगड खाणीत स्फोट करण्यात आला. या स्फोटामुळे ३३ केव्ही विद्युत वाहिन्यांवर दगड पडून वीजपुरवठा खंडित झाला. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सहा तास वीज नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत केला.

खदानचालकाची भूमिका
खदानचालक शिवाजी दहे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, संबंधित दगडखाण १९९५ पासून सर्व परवानग्यांसह सुरू असून कोणत्याही नियमभंगाची तक्रार नाही. खाण सुरू झाल्यानंतर अनेक वर्षांनी परिसरात प्रशासकीय इमारती उभारण्यात आल्या. तसेच महावितरणने खाण क्षेत्रावरून ३३ केव्ही वीजवाहिन्या टाकल्या असून, स्फोटांमुळे त्यांना धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत पूर्वी अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महावितरणचा दावा
महावितरणचे उपविभागीय अभियंता विशाल चापके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खाणीत होणाऱ्या स्फोटांमुळे ३३ केव्ही व ११ केव्ही वीजवाहिन्यांमध्ये वारंवार बिघाड होत आहे. ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री पावणे एकपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला. या घटनेमुळे अर्धे मानवत शहर आणि १८ गावे अंधारात होती. यामुळे नागरिकांना त्रास झाला तसेच महावितरणचे आर्थिक नुकसानही झाले. यापूर्वी ४ फेब्रुवारीलाही अशाच प्रकारे वीजपुरवठा खंडित झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तहसीलदारांच्या निर्णयाकडे लक्ष
या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर निष्काळजीपणाचे आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे आता या वादाचा निकाल तहसीलदार काय लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या वादात सर्वाधिक फटका मात्र सामान्य नागरिकांनाच बसत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT