परभणी

परभणी: कौसडी परिसरात सोयाबीन काढणीला सुरुवात; उत्पन्नात घट

अविनाश सुतार

कौसडी, पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील कौसडी व परिसरात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. सध्या शेतकरी राजा सोयाबीन काढणीत व्यस्त असून मजुरांच्या साह्याने सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी सोयाबीन काढणीसाठी मजुरांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे पदर रिकामे राहत आहे. प्रति सोयाबीनची बॅग काढणीसाठी मजूर 4500 घेत आहेत, यामुळे शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.

सोयाबीनच्या एक बॅग लागवडीचा खर्च  30 ते 32 हजार रुपये

सोयाबीनची एक बॅग लागवड करण्यापासून ते बाजारात विक्री करण्यापर्यंत अंदाजे 30 ते 32 हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च येत असतो. यामध्ये नांगरवटी तीन हजार रुपये, रुटर पंधराशे रुपये, पाळी 600 रुपये, पेरणी एक हजार रुपये, बियाणेची बॅग 4000 रुपये, खत 1800 रुपये, तण नाशक फवारणी एक हजार रुपये, तीन कोळपणी तीन हजार रुपये, मळणी यंत्रातून काढणे तीन हजार रुपये, सोयाबीनसाठी पोते खरेदी 600 रुपये, शेतातून घरी आणण्यासाठी ट्रॅक्टर खर्च एक हजार रुपये, बाजारात विक्रीला नेण्यासाठी ट्रॅक्टर खर्च व हमाली दोन हजार रुपये असे शेतकऱ्याला एक बॅग सोयाबीन लागवडीपासून ते विक्री करेपर्यंत अंदाजे 30 ते 32 हजार रुपये खर्च येत आहे.

शासनाने बाहेरून तेलाची आयात केल्यामुळे सोयाबीनला भाव नसल्याने प्रतिक्विंटल सोयाबीन 3800 ते 4000 रुपये पर्यंत विक्री होत आहे. सोयाबीनच्या एका बॅगला अंदाजे आठ ते नऊ क्विंटलचा उतार आला. तरी प्रति बॅगला 36 हजार रुपयाचा उत्पन्न होत आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ठोका धरला. तर शेतकऱ्याच्या पदरात काहीच उरत नाही. शेतकऱ्यांचा पदर रिकामा राहत आहे. शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय हे सध्या घाट्यात जात असून तरी देखील शेतकऱ्यांना शेती शिवाय पर्याय नाही.

शासनाने सोयाबीन तेल व कापूस बाहेरून आयात केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही यासाठी सरकारचा विरोध करण्यासाठी व शेतीमालाला भाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून विरोध करण्याची गरज निर्माण झाली आहे. आमदार खासदारांनी सरकार समोर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते मार्गी लावण्याची गरज आहे. तरच शेतकरी राजाच्या शेतीमालाला भाव मिळेल व शेतकरी सुखी समाधानी जीवन जगेल.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT