परभणी: मुलीस अश्‍लिल व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी दुकानादारास शिक्षा

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

परभणी, पुढारी वृत्तसेवा : सेलू शहरातील एका अल्पवयीन मुलीस अश्‍लिल व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी किराणा दुकानदारास पोक्सो कायद्यानुसार सहा महिने सश्रम कारावास व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एस. नायर यांनी ही शिक्षा आज (दि.१६) सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेलू शहरातील एक अल्पवयीन मुलगी किराणा दुकानदार मुकूंद रामेश्‍वर भुलंगे यांच्या दुकानावर काही सामान आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी मुकूंद भुलंगे यांनी वाईट उद्देशाने तिला अश्‍लिल व्हिडिओ दाखविले. ही बाब तिने कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर 26 एप्रिल 2019 रोजी सेलू पोलीस ठाण्यात तिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन फौजदार संतोष माळगे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरून आरोपी मुकुंद याने विनयभंग केल्याचे सिद्ध झाले. मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांनी या संदर्भात केलेला युक्तीवाद न्यायाधीश नायर यांनी ग्राह्य धरून मुकुंद भुलंगे यास कलम 354 नुसार दोषी ठरवून पोक्सो कायद्यानुसार सहा महिने सश्रम कारावास व 5 हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सानप, फौजदार सुरेश चव्हाण, महिला हवालदार वंदना आदोडे यांनी काम पाहिले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news