Sonpeth taluka Farmer Death
सोनपेठ: सोनपेठ तालुक्यातील मौजे वणीसंगम येथील शेतकरी विलास प्रकाश काळे (वय ३८) या तरुण शेतकऱ्याने नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा या आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
सोनपेठ तालुक्यातील मौजे वाणीसंगम येथील शेतकरी विलास काळे यांच्या नावाने गट न. १८ शिवार वाणीसंगम येथे ४५ आर .जमीन असून त्याच्या सातबारावर विविध नॅशनल बँकेचे कर्ज आहे. मृत शेतकरी हा अतिशय उपक्रमशील शेतकरी होता. शेतीमध्ये विविध प्रयोग करून चांगल्या पद्धतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यांची शेती नदी काठी असलेल्या शेतात विलास याने सोयाबीन पेरले होते. नदीला पूर तसेच जास्त पर्जन्यमान झाल्याने सुरुवातीला पेरणी केलेले सोयाबीन नष्ट झाले होते.
पिकाचा पिक विमा काढला होता. पण स्थानिक आपत्ती हे ट्रिगर राज्य सरकारने पिक विम्यातून वगळल्यामुळे त्यांना त्याची तक्रार देता आली नाही. त्यांनी त्याच्या जमिनीवर दुबार कापसाची पेरणी केली असता. ती देखील मर तसेच बुरशी रोगामुळे वाया गेली. त्यांना मागील पीक विमा सुद्धा मिळाला नव्हता. तसेच सततची आलेली नापिकीमुळे, सोयाबीन तसेच कापसाचे पडलेले भाव यामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे कर्ज परतफेड करू शकला नाही.
विलास काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. मोठा मुलगा जयप्रकाश काळे हा दहावीला ७८ % गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. पुढील शिक्षणासाठी तो लातूर येथे आयआयटी ची तयारी करत आहे. दुसरा मुलगा यश काळे यांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा भरून निघत नव्हता. इतर कारणातून नैराश्य आल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.