Malegaon incident Sonpeth tehsil office march
सोनपेठ : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव डोंगराळे येथील तीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी सर्व शाखीय सुवर्णकार व सराफा असोसिएशने सोनपेठ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये सकाळपासूनच शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दिवसभर बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
ग्रामदैवत हनुमान मंदिर येथून विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात शहरातील सर्व जाती धर्माचे नागरिक, खाजगी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार सुनील कावरखे यांना शाळेतील विद्यार्थी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून आरोपीला लवकरात लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. पोलिस अथवा प्रशासनातील कोणताही निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करावी. तसेच सोनपेठ तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संरक्षण म्हणून चिडीमार पथक नेमण्यात यावे, आदी सह मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या घटनेचा निषेध व्यक्त करत ही बाब गांभीर्यपूर्वक घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे दिलेल्या निवेदनात नमुद आहे. शेवटी या घटनेचा निषेध व्यक्त करून सोनपेठकरांच्या वतीने चिमुकलीला श्रद्धांजली वाहून मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात शहरातील व्हिजन पब्लिक स्कूल व जिजामाता पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.