मालेगाव : तालुक्यातील वस्ती शाळेत शिक्षकाने नऊवर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची शिक्षण क्षेत्रात काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिभाऊ सुकदेव खैरनार (56, रा. दुंधे, ता. मालेगाव) असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. दाखल फिर्यादीनुसार संशयित खैरनार हा गेल्या वर्षभरापासून विद्यार्थिनीशी अंगलट करत लैंगिक अत्याचार करत होता. शुक्रवारी (दि.30) विद्यार्थिनी शाळेत जात नसल्याने याविषयी तिच्या कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता पीडितीने तिच्याशी वेळोवेळी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार बाल लैंगिक अत्याचार, पोक्सो व अॅट्राॅसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे करीत आहेत.
हा प्रकार समोर आल्यानंतर गटशिक्षणाधिकारी तानाजी धोंगडे यांनी या प्रकरणी पोलिसांना अहवाल दिला असून, संबंधित शिक्षकाच्या निलंबनासाठी जिल्हा शिक्षण अधिकार्यांना प्रस्ताव सादर केला आहे.