Sonpeth Municipal Council Pudhari
परभणी

Sonpeth Municipal Council | सोनपेठ नगरपरिषदेत २.५८ कोटींच्या घरकुल निधी अपहारप्रकरणी गुन्हा

तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फसवणूक व विश्वासघाताचे आरोप

पुढारी वृत्तसेवा

Sonpeth Gharkul Yojana Corruption

सोनपेठ : सोनपेठ नगरपरिषदेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) निधीतील तब्बल २ कोटी ५८ लाख रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परभणी जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मुंबई येथील म्हाडाचे अधिकारी महेश विष्णू चव्हाण (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, सोनपेठ नगरपरिषद हद्दीतील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर झालेला निधी नियमांनुसार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक होते.

महाराष्ट्र राज्याची स्टेट नोडल एजन्सी (SNA) म्हणून कार्यरत असलेल्या म्हाडामार्फत १० जानेवारी २०१९ ते ८ जून २०२२ या कालावधीत २ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी सोनपेठ नगरपरिषदेला वितरित करण्यात आला होता. मात्र, तपासात संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यांऐवजी इतर व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये हा निधी वर्ग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाचा निधी अपहार करून पात्र लाभार्थ्यांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीच्या आधारे सोनपेठ पोलीस ठाण्यात तत्कालीन मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध सरकारी नोकराने केलेला विश्वासघात, फसवणूक तसेच संगनमताने गुन्हा केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT