Sonpeth road accident
सोनपेठ : शहरातील सोनखेड परिसरात सफाई काम करत असताना हायवाच्या धडकेत नगर परिषदेत कार्यरत असलेल्या एका महिला सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ८) सकाळी सुमारे १० : १५ वाजता घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
या दुर्घटनेत तुळसाबाई दत्ता पाडुळे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर धूपताबाई सूर्यभान वाघमारे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळसाबाई पाडुळे आणि धूपताबाई वाघमारे या दोघी सोनपेठ नगर परिषदेच्या सफाई कामगार असून त्या सकाळी सोनखेड भागातील एका घराजवळ रस्त्याची साफसफाई करत होत्या. त्याच वेळी एमएच १२ एफसी ७४५९ क्रमांकाच्या हायवा वाहनाचा चालक विठ्ठल अंगद मुंडे (रा. रेवली, ता. परळी) याने निष्काळजीपणे आणि वेगात वाहन चालवत दोघींना जोराची धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की हायवाचे पुढील चाक तुळसाबाई यांच्या शरीरावरून गेले. घटनेनंतर उपस्थितांनी आरडाओरडा करताच चालकाने वाहन थांबवले. तत्काळ दोन्ही जखमींना सोनपेठ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तुळसाबाई यांना मृत घोषित केले. धूपताबाई वाघमारे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी मृत महिलेचे पती दत्ता ग्यानोबा पाडुळे यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात चालक विठ्ठल मुंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.