

Jintur Zari Road Accident
झरी : येथून जवळच असलेल्या झरी ते जिंतूर मार्गावरील कॅनॉलजवळ मंगळवारी (दि.7) सकाळी 10.40 वाजेच्या सुमारास कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात सख्ख्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
शितल महादेव व्यवहारे (वय 22) , श्रीराम महादेव व्यवहारे (वय 21) (दोघे रा. रा.वटकळी, ता.सेनगाव, जि.हिंगोली) अशी मृत सख्ख्या बहिण-भावांची नावे आहेत.
झरीहून जिंतूरकडे जाणारी मोटारसायकल (क्र. एमएच 38 टी 2231) आणि जिंतूरहून झरीकडे येणारी कार (क्र.एचआर 26 डीएफ 7890) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. कार राँग साईडने येत असल्याने कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ही धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलवरील सख्ख्या बहिण-भावाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच झरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रूग्णवाहिका चालक दिनेश बिरगड यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना तत्काळ परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली व मदतकार्य सुरू केले. ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू, अभिजीत आडके, आरटीओ अविनाश चोंडे, राष्ट्रीय महामार्ग शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज शिनगारे, वाहतुक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वामन बेले, सानप, असीम खान, जमादार तावरे, सुधीर डोंबे, शंकर जाधव, महामार्ग इंजि.अमित गायकवाड यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
दरम्यान, अपघातातील मयत शितल ही बीटेक द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी परभणीला भाऊ श्रीराम याच्या समवेत आली होती. येथील काम आटोपून ते दोघेही बहिण-भाऊ परत गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. याप्रकरणी सचिन मनोहरराव पांचाळ यांच्या फिर्यादीवरून कारचालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.