पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: सोनखेड (मोठी पांढरी) (ता.पूर्णा) येथील महिला सरपंच मुक्ताबाई सोपानराव सुर्यवंशी यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव आज (दि.२४) फेटाळून लावण्यात आला. विरोधक सदस्यांचे तीन चतुर्थांस बहुमत सिद्ध न झाल्याने तहसीलदारांनी अविश्वास ठराव फेटाळला. त्यामुळे सुर्यवंशी यांचे सरपंचपद कायम राहिले. आज सकाळी ११ वाजता सोनखेड ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचासह सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली.
यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने ४ सदस्यांनी हातवर करुन होकार दर्शविला. तर २ सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे अविश्वास ठराव हा तीन चतुर्थांस बहुमत सिद्ध न करु शकल्यामुळे तहसीलदार बोथीकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी पंढरीनाथ शिंदे, सहाय्यक महसूल अधिकारी व्यंकटेश जज्जरवार यांनी अविश्वास फेटाळून लावला. दरम्यान, थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाविरुद्ध एकूण ५ सदस्यांनी १७ फेब्रुवारीरोजी तहसिल कार्यालयात अविश्वास ठराव अर्ज दाखल केला होता. यावेळी पं. स. विस्तार अधिकारी व्ही. के. पुरी, ग्रामसेवक एम. जे. भोसले आदी उपस्थित होत्या.
सरपंच मुक्ताबाई सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक सुभाषराव सुर्यवंशी य ग्रा. पं. सदस्य महानंदा दासराव देसाई, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे कार्यकर्ते तथा पीडीसी बँकेचे तज्ञ संचालक नंदकुमार डाखोरे, प्रभारी तालुकाध्यक्ष सुभाष देसाई, नितीन कदम, गिताराम देसाई, उत्तमराव ढोणे, दाजीबा भोसले, प्रा. नारायण सुर्यवंशी, हरिभाऊ कदम, चांदोजी बोबडे, मारोतराव बखाल, गोविंदराव आवरगंड, प्रभाकर डाखोरे, खंडोजी पवार, साहेबराव भाकरे आदी उपस्थित होते.