

पूर्णा : शहरातील रेल्वे स्थानका नजीक असलेल्या लोहमार्गवर धावत्या रेल्वेखाली सापडून एका २५ वर्षीय युवकाचा कटून जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि.२३ ) फेब्रुवारी रोजी पहाटेच्या वेळी घडली. दरम्यान, या घटनेची नोंद पूर्णा येथील रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. पूर्णा शहरातील भिमनगर येथील अमित दिनेश लाठे असे मयत युवकाचे नाव आहे.
या घटनेसबंधी अधिक वृत्त असे की, पूर्णा शहरातील रेल्वे स्टेशन जवळील परभणीच्या दिशेकडे जाणा-या रेल्वे लोहमार्ग रुळावरील उच्च दाबाच्या इलेक्ट्रीकल खांब क्र ३१८/१६ नजीक कोणीतरी युवक रेल्वेने कटून शरिराचे दोन भाग झालेल्या व रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू पावलेल्या अवस्थेत पहाटेच्या वेळी विजयनगर परिसरातील नागरिकांना दिसून आला. त्यावरुन घटनास्थळी पाहणा-या नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. त्यातील काही नागरिकांनी या घटनेची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी कळवली.
माहिती मिळाल्यावर रेल्वे लोहमार्गाचे सपोनि हनूमंत पांचाळ, पोलिस कर्मचारी सचिन निकाळजे ,अविनाश डावरे, होमगार्ड प्रकाश वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांनी पाहणी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मयताची ओळख पटवली असता तो पूर्णा शहर भिमनगर येथील रहिवासी अमित दिनेश लाठे याचा असल्याचे निष्पन्न झाले. तो पहाटेच्या वेळी रेल्वे लोहमार्ग ओलांडून जात असताना धावत्या रेल्वेच्या धडकेत कटून मृत्यू पावला असावा असा अंदाज नागरिकांतून वर्तविण्यात येत असून या घटनेमुळे पूर्णा शहरासह भिमनगरावर एकच शोककळा पसरली आहे.