Tadkals Sirkalas Temple Theft
ताडकळस : पूर्णा तालुक्यातील सिरकळस येथील महादेव मंदिरात आज (दि. २६) पहाटे चोरीची घटना घडली. महादेवाचे पितळाचे मुकुट, तांब्याचे गळकं कळस, पूजेचे ताट आदी अंदाजे ४० हजार रुपयांच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या.
या प्रकरणी गुलाबराव ग्यानबा भोसले यांनी ताडकळस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मुजम्मिल शेख सरफराज (रा. कुरबान अली शहा नगर, परभणी) आणि शेख शाहरुख शेख रफिक (रा. परभणी) यांनी संगणमत करून चोरी केली. हे दोघे ऑटो रिक्षातून (क्र. MH 22 AP 4313) येऊन पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास मंदिरातून सामान पोत्यात भरून नेत होते. त्यावेळी शेख मुजम्मिल हा पोलिसांच्या ताब्यात आला, तर शेख शाहरुख पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी एएसआय सुजलोड हेही उपस्थित होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुजलोड करीत आहेत.