Godavari river drowning two youths dead
सोनपेठ : कंदोरीसाठी आलेले दोघेजण गोदावरी नदीपात्रात पोहोण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २) परभणी जिल्ह्यातील शिरोरी येथे घडली. मृत दोघेजण परभणीतील धार रोडवरील रहिवाशी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत हे नातेवाईकांसोबत शिरोरी येथे कंदोरीच्या कार्यक्रमासाठी आले होते. सोनपेठ हद्दितील शिरुरी येथे असलेल्या दग्र्याच्या ठिकाणी परभणी येथून काहीजण कंदोरी करीता आले होते. यातील सोफियान शेख जावेद (वय १६) रऊफ खान करीम खान (वय २६, दोघे रा. महात्मा गांधीनगर धार रोड) हे गोदावरी नदीत पोहोण्यासाठी उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले.
या घटनेची माहिती महसूल, पोलीस पथकाला देण्यात आली. तहसिलदार सुनील कावरखे, पोलीस निरीक्षक अशोक गिते, तलाठी हरकळ यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शोध पथकालाही बोलावण्यात आले. स्थानिक भोई यांच्या मदतीने सोफियानचा शोध घेण्यात आला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर रऊफ खान याचा मृतदेह गंगाखेड पोलीस ठाणे हद्दित गोदावरी नदीपात्रात मिळून आला.