ताकतोडा येथे शेतकऱ्यांनी विहिरीत उड्या घेत जलसमाधी आंदोलन केले Pudhari
परभणी

Parbhani Farmers Protest | ताकतोडा येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

पूर्णवेळ कृषी अधिकाऱ्यांसह बोगस खत-पेस्टिसाइड कंपन्यांवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Sengaon Farmers Well Protest

सेनगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि. १९) ताकतोडा येथे शेतकऱ्यांनी विहिरीत उड्या घेत जलसमाधी आंदोलन केले. कृषी विभागाच्या कार्यपद्धतीसह रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरही आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सेनगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. तसेच जिल्ह्यातील बोगस खत व पेस्टिसाइड कंपन्यांची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप

रोजगार हमी योजनेअंतर्गत सेनगाव तालुक्यात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून शासकीय कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष काम करण्यास टाळाटाळ करून अन्य कामांत व्यस्त असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

या विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी ताकतोडा येथील विहिरीत उड्या घेत जलसमाधी आंदोलन केले.

आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुकाध्यक्ष प्रवीण मते, श्याम मते, अक्षय सावखे, चंद्रकांत सावके, निखिल शेवाळे, महेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

दरम्यान, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनायक देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. कृषी विभागाचे जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी काळे यांनीही आंदोलनस्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी. अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT