Youth Death  File Photo
परभणी

Parbhani Youth Death | मराठा आरक्षणाच्या तणावातून सेलू तालुक्यातील तरुणाने जीवन संपविले

देवगाव फाटा परिसरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

चारठाणा : मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या चिंतेतून देवगाव फाटा येथील एका ३४ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन जीवन संपविले. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगन्नाथ उत्तमराव मोरे (वय ३४, रा. देवगाव फाटा, ता. सेलू) असे मृत तरुणाचे नाव आहे. २८ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० ते २९ ऑगस्ट रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले.

"मराठा आरक्षण कधी मिळणार? आरक्षण मिळाले नाही तर मुला-बाळांना नोकरी कशी मिळणार?" या विवंचनेत जगन्नाथ मोरे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. मृत जगन्नाथ यांचे भाऊ शिवाजी उत्तमराव मोरे (वय ४५) यांनी या घटनेबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पिंपळे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली आहे. प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एका तरुण शेतकऱ्याने जीवन संपवल्यामुळे देवगाव फाटा व सेलू तालुक्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT