पूर्णा बायपास रेल्वे प्रकल्प मंजूर Pudhari Photo
परभणी

Parbhani Railway News | पूर्णा बायपास रेल्वे प्रकल्प मंजूर, मराठवाड्याच्या विकासाला चालना

रेल्वे इंजिन रिव्हर्स वेळ वाचणार, प्रवासी व मालवाहतूक होणार गतिमान

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात 72.34 कोटी खर्च करून पूर्णा बायपास लाईन (3.22 किमी) मंजूर करण्यात आली असून हा प्रकल्प मराठवाड्याच्या रेल्वे गतिशीलतेसाठी आणि प्रादेशिक विकासासाठी गेम चेंजर ठरणार आहे. असा विश्वास रेल्‍वे प्रशासनाने व्यक्‍त केला आहे.

सदर बायपासमुळे दक्षिण भारतातून (हैदराबाद) उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना पूर्णा येथे इंजिन रिव्हर्स करण्याची गरज राहणार नाही. परिणामी वेळ वाचेल आणि प्रवास अधिक वेगवान होईल. बायपासवर एक नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात येणार असून, त्यामुळे पूर्णा शहरासह आसपासच्या गावांना थेट गाड्यांमध्ये प्रवेश मिळणार आहे. लातूर, परळी, मुदखेडप्रमाणेच पूर्णा बायपासमुळे रेल्वेची वाहतूक क्षमता वाढणार असून, नव्या गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा होईल. मालवाहतुकीचा वेगही वाढेल. हा बायपास पाणथळ जमिनीतून जात असल्याने कोणतेही विस्थापन होणार नाही. रेल्वे बोर्डाने विद्यमान स्टेशनशेजारीच नवीन ‘पूर्णा स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे शहरातील रेल्वे सेवा आणखी सक्षम होणार आहेत.

या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी वाढणार असून, टाउनशिपचा विस्तार, व्यवसाय व सामाजिक-आर्थिक प्रगतीस चालना मिळणार आहे. नांदेड विभागासाठी ही योजना दूरगामी परिणाम करणारी ठरेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सदर रेल्वे बायपासला पूर्णेकरांसह बाधीत शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

दरम्यान, असे असले तरी सदरील रेल्वे बायपास झाला तर ह्या बायपासवरुन काही विशेष रेल्वे गाड्या वळवल्या जाणार असल्यामुळे पूर्णा रेल्वे जंक्शनचे अस्तित्व नष्ट होणार आहे. अशी भिती वाटू लागल्याने या रेल्वे बायपासला पूर्णेकर व गौर ,बरबडी, आडगाव लासिना येथील रेल्वे बायपास बाधीत शेतकऱ्यातून कडाडून विरोध केला जात आहे. हा बायपास रद्द करण्यासाठी जन आंदोलन छेडण्याचाही एक बैठकीतून निर्धार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT