Purna Youth Attacked
पूर्णा : शहरातील अष्टभुजा देवी मंदिर परिसरातील शास्त्रीनगर भागात एका तरुणावर तिघा अज्ञात चोरट्यांनी प्राणघातक हल्ला करून त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि दुचाकी असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना १३ मार्च रोजी संध्याकाळी घडली. या घटनेत मनोहर सोपान माघाडे (वय ३६, रा. अलंकार नगर, पूर्णा) हे गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर माघाडे हे व्यवसायानिमित्त नांदेड येथे ये-जा करतात. १३ मार्च रोजी संध्याकाळी ते नेहमीप्रमाणे नांदेडहून रेल्वेने पूर्णा स्थानकावर उतरले. स्थानकाजवळ उभी केलेली दुचाकी घेऊन ते अष्टभुजा देवी मंदिराच्या मागील रस्त्याने शास्त्रीनगरमधील घरी जात होते. दरम्यान, तिघा अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांना गाडीवरून ढकलून खाली पाडले.
यानंतर दोघांनी त्यांच्या छातीवर बसून बेदम मारहाण केली, तर तिसऱ्या व्यक्तीने डोक्यावर दगडाने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर आरोपींनी माघाडे यांच्या जवळील दोन मोबाईल, दहा हजार रुपयांची रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे व ओळखपत्र हिसकावून घेतले तसेच त्यांची दुचाकीही घेऊन पसार झाले. या घटनेत माघाडे यांचा अंदाजे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतच माघाडे यांनी पूर्णा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.
दरम्यान, शहरात चोरी, मारहाण आणि लुटालूटच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.