अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. Pudhari
परभणी

Unseasonal Rain Purna | पूर्णा तालुक्यात अवकाळीचा दुहेरी तडाखा; रब्बी ज्वारी जमिनदोस्त, शेतकरी हवालदिल

पूर्णा तालुका परिसरात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत पिकांचे मोठे नुकसान केले

पुढारी वृत्तसेवा

Purna Taluka Unseasonal Rain

पूर्णा : पूर्णा तालुका परिसरात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे. ३० मार्चच्या रात्रीनंतर १ एप्रिलच्या रात्रीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

वादळी वाऱ्याच्या तडाख्यात परिपक्व झालेली व कापणीस आलेली रब्बी ज्वारी पूर्णपणे जमिनदोस्त झाली आहे. दाण्यांनी भरलेली कणसं जमिनीवर आपटून चिखलात माखल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

याशिवाय आंबा फळांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. यंदा झाडांना भरघोस आंबा लागल्याने चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती; मात्र अचानक आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने ही आशा धुळीस मिळवली. “पीक जोमात आले तरी ते शेतकऱ्यांच्या घरात येईपर्यंत खात्री नसते,” ही म्हण पुन्हा खरी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, गहू, हरभरा, ज्वारी आणि फळबागांसह हळद पिकालाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सध्या हळद काढणी आणि वाळवणीचा हंगाम सुरू असताना अनेक शिवारात वाळणीला टाकलेली हळद पावसामुळे भिजत आहे. ढग दाटून येताच व विजांच्या कडकडाटास सुरुवात होताच शेतकरी ताडपत्रीने हळद झाकण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. दरवर्षी हळद हंगामात अवकाळी पावसामुळे निर्माण होणाऱ्या या समस्येमुळे शेतकरी वैतागले आहेत.

तसेच, जमिनीवर पडलेल्या ज्वारीच्या कणसांवर रानडुक्कर, मोर आणि इतर पक्ष्यांचा डल्ला सुरू झाला आहे. कणसं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रंदिवस राखण करावी लागत असून त्यांची मोठी दमछाक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT