Purna Transformer Fire Pudhari
परभणी

Purna Electricity DP Fire | पूर्णेत विद्युत डीपीला आग; पोलिस व अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

Purna Transformer Fire

पूर्णा : पूर्णा शहरातील मेन रोडवरील आयुर्वेदिक कॉलेजजवळ असलेल्या महावितरणच्या विद्युत डीपीने बुधवारी (दि. २७) रात्री अचानक पेट घेतल्याची घटना घडली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेन रोड परिसरातील आयुर्वेदिक कॉलेजजवळ महावितरणचे विद्युत रोहित्र बसविण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास डीपीमधून ठिणग्या पडू लागल्या आणि काही क्षणांतच त्यातून धुराचे लोट निघत आग भडकली. आगीचे लोळ पाहून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली.

यावेळी गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास पडलवार आणि सुधीर काळे यांनी ही घटना पाहताच तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे दीपक गवळी, अमजद कुरेशी आणि सोनाजी खिल्लारे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशामक बंबाच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून काही क्षणांत आग विझवली.

पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, महावितरणच्या जीर्ण आणि खिळखिळ्या झालेल्या डीपी व वीज यंत्रणेची नियमित देखभाल व दुरुस्ती होत नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन ऊस जळाल्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT