Purna Soybean Seed Rate Hike  Pudhari
परभणी

Soybean Seed Price | सोयाबीन बियाण्यांच्या दरात मोठी वाढ; शेतकरी आर्थिक संकटात

सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Purna Soybean Seed Rate Hike

पूर्णा : तालुक्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतकरी बियाणे व खतांच्या खरेदीसाठी आर्थिक जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. मात्र, यंदा सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

सध्या २५ किलोच्या एका सोयाबीन बियाण्याच्या गोणीची किंमत विविध कंपन्यांनुसार सुमारे ३,६०० ते ४,००० रुपये इतकी झाली आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांच्या दरातही गतवर्षीच्या तुलनेत प्रति गोणी सुमारे ३५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पेरणीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोरडवाहू शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वर्षभर कष्ट करून नैसर्गिक संकटांचा सामना करत उत्पादित केलेल्या सोयाबीनला बाजारात केवळ ४ ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव मिळतो. मात्र, पेरणीच्या हंगामात त्याच सोयाबीनची प्रक्रिया करून विविध कंपन्या बियाण्यांच्या स्वरूपात अधिक दराने विक्री करत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडत आहे.

शेतकरी संघटनांच्या मते, सोयाबीन हे सरळ वाणाचे पीक असून त्यामध्ये विशेष संशोधन किंवा संकरित तंत्रज्ञानाचा वापर नसतो. अनेक शेतकरी स्वतःच्या शेतातील बियाण्याचाही वापर करतात. त्यामुळे सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत एवढी वाढ करण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संशोधनाधारित कापूस किंवा संकरित ज्वारीच्या बियाण्यांप्रमाणे सोयाबीन बियाण्यांच्या दरवाढीचे समर्थन करता येणार नाही, असेही शेतकरी सांगत आहेत.

सोयाबीन बियाण्यांच्या वाढलेल्या किमती तातडीने कमी कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अन्यथा सरकारच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी वर्गाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT