

पूर्णा : तालूक्यातील रामापूर येथील शेत अखाड्यावरुन ता ७ जून रोजी सालगड्यास चाकूचा धाक दाखवून लागवडीसाठी साठवून ठेवलेले हळदबेणे, तुषार संच पाईप असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला होता. सदर घटनेची तक्रार पूर्णा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
स्थानिक पोलिसांना अज्ञात चोरट्यांचा शोध लावण्यात यश आले नव्हते. गुन्हा घडून बरेच दिवस लोटले गेले. अखेर सदर प्रकरणी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाकडे तपास दिला. दरम्यान, स्थागुशाचे पोनि अशोक जायभाये, पोउनि चंदनसिंह परिहार,पोह रंगनाथ दुधाटे, महेश कवठाळे, सुर्यकांत फड, राहुल परसोडे, माणिक वाघ, हनुमान ढगे,शरद सावंत, निलपत्रेवार,माने ही टिम आरोपींच्या शोधास लागली.
पोलीस पथक २० जून रोजी चोरी घरफोडी गुन्हे उघड करण्याच्या अनुषंगाने ताडकळस,पूर्णा हद्दीत आरोपीतांची माहिती घेत असताना माहिती मिळाली की हळदीचे बेणं, अल्केश अमृतराव देशमुख याने त्याचे इतर साथीदारासह मिळून चोरी केली आहे. त्याचा शोध घेवून त्यास विचारपूस केली असता त्याने साथीदार जगन्नाथ माधवराव मोहिते,रा महागाव ता पूर्णा.अभिषेक मुंजाजी नाईकवाडे रा पिंपरी देशमुख,करण भगवानराव चिमटे, सचिन उर्फ भव-या सुरेश डुकरे, यांच्यासह मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली.
सदर चोरुन नेल्याचा मुद्देमाल त्याचे शेतात असल्याचे दाखवून दिले.यातील ६० हजार रुपयांचा हळदीचे गोल व लांब शेंग असलेले बेणे,५ लाख रुपये किंमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर हेड व ट्रॉली असा एकूण ५ लाख ६० हजार रुपये मुद्देमाल जप्त करुन तीन आरोपींना ताब्यात घेवून जेरबंद करण्यात आले.