Purna Sugarcane Farm Fire
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील बरबडी शिवारात सोमवारी (दि. २६) दुपारी तीनच्या सुमारास विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत दोन एकरांतील उभा ऊस आणि कृषिपंपासाठी बसवलेले सोलार पॅनल जळून खाक झाले. या दुर्घटनेत शेतकरी शिवाजी खंडोजी शिंदे आणि देविदास माणिकराव शिंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तोडणीसाठी तयार असलेला परिपक्व ऊस डोळ्यांदेखत जळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी शिंदे आणि देविदास शिंदे यांची बरबडी शिवारात शेतजमीन आहे. शिवाजी शिंदे यांच्या शेतातील दीड एकर, तर देविदास शिंदे यांच्या शेतातील ३० गुंठे उभ्या उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. विद्युत तारांमधून पडलेल्या ठिणगीमुळे आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण ऊस जळून खाक झाला. याशिवाय, शेतातील कृषिपंप चालवण्यासाठी बसवलेले सोलार पॅनलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या दुर्घटनेत शिवाजी शिंदे यांचे सुमारे चार लाख रुपयांचे, तर देविदास शिंदे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना या आगीच्या घटनेने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
प्रशासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जळालेल्या उसाच्या प्रतिटनामागे ७०० ते ८०० रुपयांची दरकपात करण्याची अट रद्द करावी, अशी मागणी शिवाजी शिंदे आणि देविदास शिंदे यांनी पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडे केली आहे.