पूर्णा : येथील रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक ४ समोरील मोकळ्या आवारातील किना-यावर काहींनी अनाधिकृतपणे हॉटेलस् व पानपट्या थाटून व्यवसाय चालू केला होता. त्यावर दमरे नांदेड विभाग रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत ता.४ सप्टेंबर रोजी दिवसभर हातोडा चालवून अतिक्रमण हटवले.
सदरील हॉटेल व चहापाणी पाणपट्याचे दुकाने हे काही जणांनी मागील ब-याच दिवसापासून अनाधिकृतपणे चालू केले होते.त्याचा अडथळा प्रवाशांना येवू नये म्हणून ही कार्यवाही रेल्वे प्रशासनाने हाती घेवून ते खुले केले. त्यामुळे ह्या व्यवसायीकात एकच खळबळ उडाली. सदर अतिक्रमण पोकलेन क्रेनद्वारे हटवण्याची मोहीम चालू करताच काहींनी ते स्वतःहून काढून घेतले तर जे काढत नव्हते त्यांची दुकाने पोकलेन क्रेनने उचलून काढून घेण्यात आले.
याप्रसंगी रेल्वेचे अधिकारी व पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर सदर प्रशासनाने रेल्वे ग्राऊंडवरील संरक्षण भिंतीला खेटून टाकण्यात आलेला ओला सुका घणकचरा देखील साफसफाई करण्यात आला. येथील रेल्वे ग्राऊंडवर अनेक हौसे नवसे येवून तेथील कंपाऊंड वॉल जवळील झाडाखाली बसून मद्यपान करुन केरकचरा टाकून घाण करतात. त्याकडे रेल्वे पोलीसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असते. येथे सातत्याने जिआरपी, आरपीएफ पोलीसांनी लक्ष दिले तर विदाऊट व्यक्ती फिरकणार नाहीत. परंतू, रेल्वे प्रशासन व पोलिसांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे रेल्वे आवारात हौशा नवशांची वावर बस्तान कायमच दिसून येत आहे. अतिक्रमण हटवल्या प्रमाणे प्रवाशाविना हे विनाकारण थांबणारे व्यक्ती कायमपणे हटवले तर येथील सुरक्षितता भक्कम होवू शकते.