Parbhani Pangra hunger strike
पूर्णा : तालुक्यातील पांगरा लासिना येथे ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत युवक पंढरी ढोणे यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. ६ एप्रिलपासून जलकुंभावर सुरू केलेल्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीतील कामांची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी ढोणे यांनी अन्नत्याग केला आहे. तीन दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने त्यांची तब्येत बिघडली असून, कावलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून, बुधवारी दुपारपासून त्यांनी पाणी पिणेही बंद केल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, उपोषण सुरू झाल्यापासून पंचायत समितीच्या संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी व अभियंते तक्रारीतील कामांची पाहणी व तपासणी करत आहेत. त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंतीही केली आहे. मात्र, “मागण्यांनुसार निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही,” असा ठाम पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून, परिस्थिती गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे.
संबंधित विभागातील कर्मचारी, विस्तार अधिकारी व अभियंते तक्रारीतील कामांची तपासणी करत आहेत. चौकशीत त्रुटी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांनी आरोग्याची काळजी घेऊन उपोषण सोडावे, अशी विनंती.- नारायण मिसाळ, गटविकास अधिकारी, पूर्णा पंचायत समिती