

Hunger Strike on Water Tank
पूर्णा: तालुक्यातील पांगरा लासिना गावात ग्रामपंचायतीमार्फत विविध योजनांअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी एका तरुणाने सोमवारपासून (दि. ६) अनोख्या पद्धतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित तरुण उंच व अवघड अशा जलकुंभावर बसून उपोषण करत असून, जलकुंभाखाली बसून अनेक ग्रामस्थांनी त्याला पाठिंबा दर्शविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२२ पासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते, नाल्या, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा, घरकुल तसेच इतर विविध कामे करण्यात आली आहेत. मात्र, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्याने केला आहे.
काही जुन्या कामांना नवीन योजनेत दाखवून बिले काढण्यात आल्याचे, तसेच काही कामांची रक्कम संबंधितांच्या मर्जीतील खात्यांवर वर्ग करून प्रत्यक्षात काम न करता पैसे काढण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. पंधरावा वित्त आयोग तसेच २५/१५ व ९०/१५ योजनांतील कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील कार्यकर्ते पंढरी नामदेवराव ढोणे यांनी हे उपोषण सुरू केले आहे. संबंधित कामांची चौकशी होऊन दोषींवर योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.