Purna Pangra Buffalo Attack
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील पांगरा-बरबडी शिवरस्त्यालगत असलेल्या अखाड्यावर गोठ्यात बांधलेल्या पशुधनावर अज्ञात व्यक्तींनी लोखंडी शस्त्राने केलेल्या क्रूर हल्ल्यातील जखमी म्हैस मंगळवारी (दि. २७) दुपारी दगावली. या घटनेमुळे शेतकरी आनंदा नागोराव ढोणे यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आणखी एक म्हैस गंभीर जखमी असल्याने शेतकरी कुटुंबाची चिंता वाढली आहे.
२४ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी ढोणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाय, म्हैस, वासरू आणि गोऱ्हा या पशुधनावर लोखंडी शस्त्राने अमानुष हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जनावरे मृत्युमुखी पडली होती, तर दुभत्या म्हशींना गंभीर जखमी करण्यात आले होते. काही म्हशींच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घालून त्यांना जखमी केल्याची माहिती समोर आली होती.
हल्ल्यात जखमी झालेल्या म्हशींवर चुडावा येथील सरकारी पशुधन विकास अधिकारी डॉ. कसबे यांच्याकडून उपचार सुरू होते. मात्र, जखमी म्हशींनी अन्न-पाणी घेणे बंद केल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यापैकी जाफराबादी जातीची दुभती म्हैस मंगळवारी दुपारी दगावली. मृत म्हशीचे शवविच्छेदन करण्यात आले. अन्य एक म्हैसही गंभीर अवस्थेत असून, तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
आधीच कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या ढोणे कुटुंबावर पशुधनाच्या मृत्यूमुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या अमानुष घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गातून संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबातील सदस्यांना या धक्क्यातून सावरणेही कठीण झाले आहे.
या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच महसूल विभाग आणि शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.