Thackeray group Independent alliance Purna Pudhari
परभणी

Purna Panchayat Samiti | पूर्णा पं. स. वर अपक्ष- ठाकरे गटाची सत्ता; बहुमत असूनही भाजप सत्तेबाहेर

Purna Political News | सभापती उज्ज्वला पिसाळ, उपसभापती काशिनाथ काळबांडे यांची निवड

पुढारी वृत्तसेवा

Thackeray group Independent alliance Purna

आनंद ढोणे

पूर्णा : पूर्णा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी मंगळवारी (दि. १०) अत्यंत चुरशीच्या वातावरणात निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत अपक्ष व उबाठा शिवसेना गटाने बाजी मारत पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली. अपक्षाच्या उज्ज्वला नारायण पिसाळ यांची सभापतीपदी तर उबाठा शिवसेनेचे काशिनाथ शंकर काळबांडे यांची उपसभापतीपदी बहुमताने निवड जाहीर करण्यात आली.

एकूण १२ सदस्यांच्या पंचायत समितीत मतदानावेळी ८ सदस्यांनी हात वर करून अपक्ष-उबाठा गटाला पाठिंबा दर्शवला. तर भाजपाच्या उमेदवारांना केवळ ४ सदस्यांचे समर्थन मिळाले. विशेष म्हणजे सभागृहात भाजपाचे ७ सदस्य उपस्थित असतानाही त्यापैकी ३ सदस्यांनी पक्षाच्या उमेदवारांना मतदान न करता अपक्ष-उबाठा गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपाला स्पष्ट बहुमत असूनही सत्ता गमवावी लागली. या घटनेमुळे भाजप गटात मोठी निराशा पसरली असून पक्षाने दिलेला व्हिप तीन सदस्यांनी झुगारल्याची चर्चा रंगली आहे.

सभापती व उपसभापती पदासाठी सकाळी १० ते १२ या वेळेत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. उबाठा-अपक्ष गटाकडून सभापती पदासाठी उज्ज्वला पिसाळ तर उपसभापती पदासाठी काशिनाथ काळबांडे यांचे अर्ज दाखल झाले. तर भाजपाकडून सभापती पदासाठी विलास गिरी आणि उपसभापती पदासाठी प्रभावती दुधाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

दुपारी २.१० ते २.२० या वेळेत अर्जांची छाननी करून उमेदवारी वैध ठरवण्यात आली. त्यानंतर सभागृहात हात वर करून मतदान घेण्यात आले. पिठासीन अधिकारी प्रतिभा गोरे आणि गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. दुपारी सुमारे ३ वाजता बहुमताने उज्ज्वला पिसाळ आणि काशिनाथ काळबांडे यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. निकाल जाहीर होताच विजयी गटाच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

‘पुढारी’चे वृत्त ठरले खरे

पूर्णा पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीची तारीख जाहीर झाल्यानंतर भाजपाकडे ७ सदस्यांचे बहुमत असल्याने विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना सत्ता स्थापन होण्याचा विश्वास होता. मात्र मागील काही दिवसांत उबाठा शिवसेना आणि अपक्ष गटाच्या नेत्यांनी राजकीय हालचाली करत भाजपाचे तीन सदस्य आपल्या बाजूला वळवले. या नाट्यमय घडामोडींचा वृत्तांत दैनिक ‘पुढारी’ने यापूर्वी प्रसिद्ध केला होता. त्यानुसार अपक्षाचा सभापती आणि उबाठाचा उपसभापती होणार असल्याचे वृत्त खरे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बहुमत असूनही भाजप सत्तेबाहेर; चर्चेला उधाण

पंचायत समिती निवडणुकीत सुरुवातीला भाजपाच्या कमळ चिन्हावर ४ सदस्य निवडून आले होते. त्यानंतर यशवंत सेनेचे २ आणि राष्ट्रवादीचा १ सदस्य भाजपात दाखल झाल्याने भाजपाची संख्या ७ वर पोहोचली होती. स्पष्ट बहुमत असूनही तीन सदस्यांनी फितुरी करत विरोधी गटाला पाठिंबा दिल्याने भाजपाला सत्ता गमवावी लागली. त्यामुळे या घडामोडींमागे नेमके काय कारण होते, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT