National Flag Insult Case Purna  Pudhari
परभणी

Purna News | पूर्णेत राष्ट्रध्वजाचा अवमान; तिरंगा इन्फ्रा कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

Parbhani News | कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ च्या कलम २ अन्वये गुन्हा नोंद

पुढारी वृत्तसेवा

National Flag Insult Case Purna

पूर्णा : शहरालगत असलेल्या पूर्णा–धनगर टाकळी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या गॅन्ट्री क्रेनवर लावलेला तिरंगा राष्ट्रध्वज जीर्ण व फाटलेल्या अवस्थेत आढळून आल्याची गंभीर घटना १५ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात राष्ट्रप्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ च्या कलम २ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा शहराजवळील ग्रामीण भागात समृद्धी महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू असून गुजरात येथील मोंटेकार्लो कंपनीसह तिरंगा इन्फ्रा कंपनीलाही ठेका देण्यात आला आहे. नांदेड रोडवरील धनगर टाकळी फाट्याजवळ संबंधित कंपनीचे कार्यालय आहे. तिरंगा इन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापक सुजित धिरुभाई पटेल (वय ३५, रा. अहमदाबाद, गुजरात) यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी गॅन्ट्री क्रेनवर राष्ट्रध्वज फडकावला होता. मात्र त्यानंतर ध्वजाची योग्य देखभाल करण्यात आली नाही. परिणामी तो कालांतराने फाटलेल्या अवस्थेत दिसून आला.

भारतीय ध्वज संहितेनुसार फाटलेला किंवा खराब झालेला राष्ट्रध्वज तत्काळ सन्मानपूर्वक खाली उतरवणे बंधनकारक असताना संबंधितांकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी कंपनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता ध्वज १५ ऑगस्ट रोजी लावल्याचे सांगण्यात आले; मात्र आवश्यक परवानगी व देखभालीबाबत समाधानकारक माहिती देण्यात आली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व फाटलेला राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवून पोलीस ठाण्यात जमा केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी मोहितखान खुर्शीदखान पठाण यांच्या फिर्यादीवरून सुजित पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पूर्णा पोलीस करीत आहेत.

या घटनेमुळे पूर्णा शहरासह तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT