Youth Jumps In Purna River Pudahri
परभणी

Parbhani Drowning | भावाला फोन करून नांदगाव-रहाटी पुलावरून तरुणाने मारली उडी; दोन दिवसांनंतर पूर्णा नदीत मृतदेह आढळला

पूर्णा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद

पुढारी वृत्तसेवा

Youth Jumps In Purna River

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा–परभणी मार्गावरील नांदगाव-रहाटी पुलावरून पूर्णा नदीत उडी घेत ४३ वर्षीय व्यक्तीने जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना रविवारी ( दि. २ ) घडली. दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर सोमवारी (दि. ३ ) सकाळी नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची पूर्णा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

मृताची ओळख बालाप्रसाद शिवदास कवले (वय ४३, मूळ रा. शनिवार पेठ, बुरूड गल्ली, बीड; सध्या रा. न्यू साईनगर, आसेगाव रोड, वसमत, जि. हिंगोली) अशी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेपूर्वी बालाप्रसाद कवले यांनी त्यांचे भाऊ मनोज शिवदास कवले यांना मोबाईलवरून फोन केला होता. त्यामध्ये त्यांनी आपल्या मुलांची काळजी घेण्याची विनंती करत मालमत्तेतील हिस्सा व ठरलेली टक्केवारी न सोडण्याचा सल्ला दिला. तसेच, मानसिक त्रास सहन होत नसल्याने पूर्णा नदीवरील रहाटी पुलावरून उडी मारून जीवन संपवत असल्याचे सांगून फोन बंद केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली. सलग दोन दिवस सुरू असलेल्या शोधकार्यानंतर सकाळी बालाप्रसाद कवले यांचा मृतदेह नदीत आढळून आला.

शोधमोहीमेत परभणी महानगरपालिका आणि पूर्णा नगरपालिकेच्या अग्निशमन दलातील दीपक कानोडे, सोनाजी खिल्लारे, गौरव देशमुख, रोहित गायकवाड आणि अक्षय पांढरे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT