Maharashtra Local Body Election
पूर्णा : पूर्णा नगरपरिषद निवडणुकीसाठी आज (दि.१७) अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे सर्व प्रमुख पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. या गर्दीमुळे तहसील कार्यालय आणि परिसराला यात्रेच्या स्वरूपात बदलला होता.
तहसीलदार आणि निवडणूक अधिकारी माधवराव बोथीकर व सहायक निवडणूक अधिकारी प्रशांत थारकर यांच्या नोंदींनुसार, नगराध्यक्ष पदासाठी एकूण 28 तर नगरसेवक पदासाठी 214 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
नगराध्यक्ष पदासाठी मुख्य उमेदवारांमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) कडून ए. बी. फार्म कमलताई जनार्धन कापसे, शिवसेना ठाकरे गटाकडून प्रेमला संतोष एकलारे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून हसीना बेगम मोहम्मद लतीफ, यशवंत सेना व आ. डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाकडून विमलताई लक्ष्मणराव कदम, वंचित बहुजन आघाडीकडून आम्रपाली केशव जोंधळे यांचा समावेश आहे.
या दरम्यान, काही पक्षांनी रॅली काढून वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ता. 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली होती; परंतु मध्यंतरात फार कमी अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या दिवशी सर्व प्रमुख पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करून गर्दी केली.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व सहाय्यक पोलीस अधिकारी रेखा शहारे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.