निवेदन देताना आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश मोदाणी, सचिव ज्ञानोबा कदम आदी  Pudhari
परभणी

Purna Bandh | मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा: पूर्णा येथील मोंढा बाजार २ दिवस राहणार कडकडीत बंद

मोंढा भागातील आडत, बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी औषधे विक्री करणारी सर्व दुकाने बंद

पुढारी वृत्तसेवा

Purna Mondha Bazaar closed

पूर्णा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पूर्णा येथील आडत व्यापाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. शहरातील नवा मोंढा भागातील आडत, बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी औषधे विक्री करणारी सर्व दुकाने दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२७ ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून "चलो मुंबई"ची हाक देत लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच केली. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आडत व्यापारी असोसिएशनच्या वतीने तहसीलदार माधवराव बोथीकर, पोलिस ठाणे तसेच मार्केट कमिटी सचिव नितीन देसाई यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात दि. २८ व २९ ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळण्याची माहिती देत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

गुरुवारी मोंढा बाजारात पूर्णपणे शुकशुकाट दिसून आला. शेतकरी वर्गांशी निगडित असलेली ही दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांनी थेट मराठा समाजाच्या मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी मराठा समाजातील असून शेतीतील संकटे, जमिनीची झालेली विभागणी, शिक्षण व रोजगारातील संधींची कमतरता यामुळे त्यांचे जीवन कठीण झाले आहे. हुशार विद्यार्थी अल्प फरकाने शासकीय नोकरीतून वंचित राहत असल्याने त्यांच्यात आत्महत्येचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सरकारकडे मराठा कुणबी नोंदीचे हजारो पुरावे असूनही जाणूनबुजून आरक्षण नाकारले जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाले तरी सरकारकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही, याबाबत व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. या निवेदनावर आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश मोदाणी, सचिव ज्ञानोबा कदम यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT