Mategaon to Aherwadi Road Bridge  Pudhari
परभणी

Purna Bridge Work | कामाई ओढ्यावर सुरू असलेल्या पुलाचे बांधकाम उलट दिशेने; शेतकऱ्याची तक्रार

शेतकरी गणपती बोबडे यांच्या शेतजमिनीच्या जवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या दिशेबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला आहे

पुढारी वृत्तसेवा

Mategaon to Aherwadi Road Bridge

पूर्णा : तालुक्यातील माटेगाव ते आहेरवाडी या मार्गावरील कामाई ओढ्यावर सध्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे काम शेतशिवार गट क्रमांक २१ मधील शेतकरी गणपती नवनाथ बोबडे यांच्या शेतजमिनीच्या जवळ सुरू असून, बांधकामाच्या दिशेबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला आहे.

बोबडे यांच्या मते, पूल बांधताना नदीच्या नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेचा विचार करणे आवश्यक असताना, सध्या काम उलट दिशेने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास पाणी त्यांच्या शेतात शिरून पिकांचे नुकसान होण्याची तसेच जमिनीची धूप होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करून बांधकाम सरळ रेषेत (कॉलममध्ये) करण्याची मागणी केली आहे.

सदर प्रकरणात संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याकडून आवश्यक उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत बोबडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, या कामाकडे त्वरित लक्ष देऊन सध्याचे बांधकाम थांबवून योग्य पद्धतीने काम करण्यात यावे, अन्यथा न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

रा. मा. २४९ ते आहेरवाडी प्र. जि. मा. १० या रस्त्यावरील साखळी क्रमांक २/८०० येथे सुरू असलेले पुलाचे बांधकाम हे नदीच्या विद्यमान वक्राकार प्रवाहाचा विचार करून सर्वेक्षणानुसार करण्यात येत आहे. पूर्वीच्या नळकांडी पुलाच्या ठिकाणीच नव्याने उंची वाढवून पाच गाळ्यांचा पूल उभारला जात आहे. तसेच, नैसर्गिक आपत्ती वगळता परिसरातील शेतजमिनीत पाणी जाऊ नये याची खबरदारी घेतली जात असल्याची माहिती उपअभियंता संजय देशपांडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT