४५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी युवकाने जीवन संपविले Pudhari
परभणी

Purna Farmer Death | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पूर्णेतील शेतकरी तरुणाने जीवन संपविले

पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील हृदयद्रावक घटना; खिशात आढळलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख

पुढारी वृत्तसेवा

Purna Youth Farmer Death

पूर्णा : तालुक्यातील सुहागन येथे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून एका ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी युवकाने जीवन संपविले. ही हृदयद्रावक घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. गणेश साहेबराव भोसले (वय ४५, रा. सुहागन, ता. पूर्णा, जि. परभणी) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश भोसले यांनी एक चिठ्ठी लिहून ती खिशात ठेवली होती. या चिठ्ठीत मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तसेच मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्णा पोलिस ठाण्याचे पोहेकॉ वसंत राठोड यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पंचनामा केला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सुहागनसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आ. डॉ. राहुल पाटील यांची सांत्वनपर भेट

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर १४ सप्टेंबर रोजी दुपारी उबाठा शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी गणेश भोसले यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी समाजातील युवक टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगत सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पाटील यांनी केली. तसेच, गणेश भोसले यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आपण सर्वजण मिळून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी साहेबराव कल्याणकर, माणिकराव सूर्यवंशी, खुशाल भोसले, जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले, सरपंच दाजीबा भोसले, गणेशराव भोसले, माऊली भोसले, दौलत भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT