Extortion Case Purna Parbhani
पूर्णा : पूर्णा शहरातील आनंदनगर परिसरात राहणाऱ्या एका नामांकित विधीज्ञाच्या घराच्या गेटवर तब्बल ४५ लाख ५५ हजार रुपयांच्या खंडणीची निनावी चिठ्ठी लटकवून त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना अटक केली असून शहरात या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदनगर येथील इंदिरा गांधी शाळेसमोर प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. घनश्याम डाखोरे पाटील वाईकर यांचे निवासस्थान आहे. ६ जून रोजी त्यांच्या घराच्या गेटवर मुलगा प्रसाद घनश्याम डाखोरे यांच्या नावे एक निनावी पत्र आढळून आले. या पत्रात ४५ लाख ५५ हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तसेच पैसे न दिल्यास प्रसाद डाखोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
पत्रामध्ये ११ जून रोजी वसमत फाटा–चुडावा रोड येथे खंडणीची रक्कम घेऊन येण्याचे निर्देशही देण्यात आले होते. सुरुवातीला हा प्रकार कोणीतरी मानसिक त्रास देण्यासाठी केल्याचा संशय कुटुंबीयांना आला. मात्र, पत्रात नमूद केलेली तारीख जवळ येत असल्याने आणि धमकीचे गांभीर्य लक्षात घेता प्रसाद डाखोरे यांनी वडील ॲड. घनश्याम डाखोरे यांच्यासह पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा रचत ठरलेल्या दिवशी वसमत फाटा–चुडावा रोड परिसरात गुप्त पाळत ठेवली.
दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास एमएच-२६-बीएक्स क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार प्रसाद डाखोरे यांच्या जवळ येऊन थांबली. कारमधील व्यक्तींनी त्यांना वाहनात बसण्याचा इशारा केला. मात्र, प्रसाद डाखोरे गाडीकडे जात असताना संशय आल्याने संबंधितांनी कार भरधाव वेगाने चुडावाच्या दिशेने पळवली.
पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून कावलगाव परिसरात वाहन अडवून तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी तन्मय तुळशीराम पाचकोर (रा. सुरवाडी, सध्या आनंदनगर, पूर्णा), केदार अशोक घवाड (रा. कानडखेड, ता. पूर्णा) आणि युवराज प्रकाश कदम (रा. रुंज, ता. पूर्णा) यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन पाटील हे पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.