Samruddhi highway workers rescue
पूर्णा: तालुक्यातील कात्नेश्वर, पूर्णा, ताडकळस, चुडावा, लिमला, कावलगाव महसूल मंडळात शुक्रवारी (दि. १२) दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे थुना नदीसह सर्वच नद्यांना पूर आला. यातच कौडगाव शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी चार मजूर पाण्यात अडकले. हे मजूर तब्बल आठ ते दहा तास जेसीबी मशीनवर बसून जीव मुठीत धरून होते. महसूल, पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या पथकांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर त्यांना सुखरूप बाहेर काढले.
पूराचा लोंढा आल्यानंतर दहा मजुरांपैकी सहा मजूर कसेबसे पोहून बाहेर आले. मात्र, उर्वरित चार मजुरांना पाण्याच्या प्रवाहामुळे बाहेर पडता आले नाही. त्यांनी जेसीबी मशिनवर आसरा घेत जिल्हा पोलिसांना घटनेची माहिती दिली. रात्री पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. परंतु नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाल्याने बचावकार्यात अडचणी येत होत्या.
त्यानंतर परभणीहून अग्निशमन दलाची बोट मागविण्यात आली. नगरपरिषदेची रेस्क्यू बोट अखेर घटनास्थळी पोहोचली. पाण्याचा जोर व खोली यामुळे अनेक तास अपयश आले तरी अखेर बोटीद्वारे अडकलेले मजूर विक्की सिंग, लक्ष्मण सिंग, सलाऊद्दीन सिद्दीकी, शिवकुमार आणि सदाकत अली यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. सुटकेनंतर मजुरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बचावपथकाचे आभार मानले.
या मोहिमेत जिल्हाधिकारी संजय चव्हाण, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार बोथीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलीस व नगरपरिषद अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकरी शेतात अडकले होते. पूर्णा तालुक्यात चौथ्यांदा अतिवृष्टी झाली असून महसूल मंडळानुसार पर्जन्यमानाची नोंद अशी पूर्णा १३९ मि.मी., ताडकळस १९४.५० मि.मी., कात्नेश्वर १४७.५० मि.मी., चुडावा ९७.५० मि.मी. व कावलगाव १०४.७ मि.मी.