Journalist Nagesh Nagthane  Pudhari
परभणी

Purna Accident | दुचाकी अपघातात पूर्णा येथील पत्रकार नागेश नागठाणे यांचा मृत्यू

भाटेगाव ते ध. टाकळी मार्गावर दुचाकी खड्ड्यात अडकून अपघात

पुढारी वृत्तसेवा

Journalist Nagesh Nagthane Dies Accident

पूर्णा : येथील ज्येष्ठ पत्रकार नागेश उर्फ नागनाथ सुभाष अप्पा नागठाणे (वय ४५, रा. आनंदनगर, पूर्णा) यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री भाटेगाव ते ध. टाकळी मार्गावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश नागठाणे हे दुचाकीवरून प्रवास करत असताना रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. ते पूर्णा येथील निवासस्थानी येत होते की ध. टाकळी गावाकडे जात होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी रस्त्यावर आडवा खड्डा खोदून त्यातून पाइपलाइन टाकण्यात आली होती. या खड्ड्यात दुचाकी अडकल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती चुडावा पोलिसांकडून देण्यात आली.

अपघाताची माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या अपघातात नागेश नागठाणे यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या कानातून व नाकातून रक्तस्त्राव होत होता, तसेच डोक्याला मोठी सूज आली होती.

रात्री सुमारे ९.१५ वाजता त्यांना उपचारासाठी पूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी रात्री सुमारे ९.३० वाजता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

पत्रकारितेबरोबरच ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते. त्यांनी व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेतही काम केले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पूर्णा परिसरातील पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या जाण्याने एक संवेदनशील आणि निर्भीड पत्रकार गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

नागेश नागठाणे यांच्या पार्थिवावर ४ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह विविध स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT