Purna Brahmal River Pollution
पूर्णा : शहरातील विविध खाजगी तसेच इतर रुग्णालयांमधून उपचारानंतर उरलेला धोकादायक वैद्यकीय कचरा थेट ब्रह्माळ नदीच्या पात्रात टाकला जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. वापरलेल्या स्टील लोखंडी सुई, सलाईन सिरिंज, रक्ताने माखलेल्या पट्ट्या, औषधांचे अवशेष व इतर वैद्यकीय साहित्य नदीपात्रात फेकले जात असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पूर्णा शहरात अनेक डॉक्टरांची खाजगी रुग्णालये असून येथे दाखल होणाऱ्या रुग्णांच्या उपचारानंतर उरलेले प्लास्टिक सलाईन बाटल्या, स्टील सुई, रक्तयुक्त पट्ट्या व अन्य वैद्यकीय कचरा नियमाप्रमाणे जैववैद्यकीय (बायो-मेडिकल) कचरा संकलन वाहनामार्फत विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मात्र, काही खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर हा कचरा अधिकृत वाहनात न देता शहराजवळील ब्रह्माळ नदीपात्रात नेऊन टाकत असल्याचा आरोप होत आहे.
या गंभीर प्रकारांकडे शासकीय आरोग्य विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नदीकाठी चरणाऱ्या जनावरांच्या पायात स्टील सुई खुपसण्याचा धोका निर्माण झाला असून, एखादे जनावर वैद्यकीय कचरा खाल्ल्याने मृत्युमुखी पडण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची खाजगी रुग्णालये चर्चेत
दरम्यान, येथील शासकीय पूर्णा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले अनेक वैद्यकीय अधिकारी नियम धाब्यावर बसवून शहरात स्वतःची खाजगी रुग्णालये चालवत असल्याचे आरोप होत आहेत. शासकीय सेवेत असताना खाजगी रुग्णालय चालवण्यास मनाई असतानाही, काही अधिकाऱ्यांनी मोठ्या इमारती उभारून खासगी प्रॅक्टिस सुरू ठेवली आहे. शासकीय रुग्णालयात केवळ औपचारिक सेवा बजावत लाखोंचा मासिक पगार उचलला जात असून खाजगी रुग्णालयांवर अधिक लक्ष दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी शासकीय आरोग्य विभागाकडून त्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप नागरिकांतून जोर धरू लागला आहे.