Khadki river flood
पूर्णा : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेगाव शिवारातील खडकी नदीला मोठा पूर आला. नदीने आपले पात्र सोडल्याने पुराचे पाणी दोन्ही काठांवरील शिवारात घुसून खरीप हंगामातील कापूस, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.
२८ सप्टेंबर रोजी पुराचे पाणी गाळमातीसह शेतात शिरल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे खरडून गेली. यात जगन्नाथ खैरे, बाबू खैरे, गोविंद खैरे, किशन खैरे, नामदेव खैरे, विठ्ठल खैरे, मुंजाजी सुर्यवंशी, शंकर खैरे, माधव सदावर्ते, प्रकाश गोडबोले, शिवाजी, प्रकाश, प्रभू खंदारे, सुभाष निवडंगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील सर्व मेहनत पाण्यात गेली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत व भरपाई देण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
तालुक्यातील पांगरा लासीना येथे २८ सप्टेंबर रोजी आरोग्य उपकेंद्रात अतिवृष्टीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात डॉ. किरण माईंदळे गोविंदपूरकर, डॉ. जोंधळे व डॉ. सोळंके (चुडावा) यांनी शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार मोफत उपलब्ध करून दिले.
सुमारे २८० हून अधिक शेतकरी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाले आहेत. अशा स्थितीत दूषित पाणी व हवामान बदलामुळे ताप, खोकला, सर्दी आदी आजार पसरू लागल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आले होते.
या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. या उपक्रमावेळी सरपंच उत्तमराव ढोणे, सदस्य जगदीश ढोणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. डॉक्टरांच्या या सामाजिक कार्याचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले.