Purna Chudawa Police Raid Pudhari
परभणी

Illegal Liquor Seized Parbhani | चुडावा येथे अवैध दारूचा मोठा साठा जप्त; तिघांविरोधात कारवाई

कावलगाव ते पिंपरण रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Purna Chudawa Police Raid

पूर्णा : चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कावलगाव ते पिंपरण रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अवैध देशी दारूचा मोठा साठा जप्त केला. गुरूवारी (दि. १३) रात्री नऊ वाजेनंतर करण्यात आलेल्या या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह एकूण ३० पेट्या दारू जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईत १ लाख १५ हजार २०० रुपये किमतीची देशी दारू तसेच २८ हजार रुपये किमतीची भिंगरी संत्रा दारू जप्त करण्यात आली. वाहनासह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ९३ हजार २०० रुपये आहे.

या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२१/२०२६, कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात तीन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

अवैध दारू विक्रीचे जाळे?

या प्रकरणात पूर्णा येथील देशी दारू विक्रेता रवि जैस्वाल, कावलगाव येथील वानकर तसेच नारायण दुधमल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. कावलगाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारूची विक्री होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे या अवैध दारू विक्रीच्या प्रकाराला आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कावलगावसह अन्य गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अवैध देशी दारूची तस्करी व विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पूर्णा व नांदेड येथील परवानाधारक देशी दारू दुकानांतून दारू आणून ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये तसेच ढाबे व खानावळींवर तिची विक्री केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अनेक ठिकाणी उघडपणे अवैध दारू विक्री सुरू असताना स्थानिक पोलिसांना याची माहिती नाही का? तसेच या प्रकाराला स्थानिक पातळीवर अभय मिळत आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

अवैध दारूविरोधात उपोषण

चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीविरोधात सोन्ना येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद कदम यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यासमोर दोन ते तीन दिवस आमरण उपोषण केले होते. त्यानंतरही अवैध दारू विक्री पूर्णपणे थांबली नसल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अखेरीस स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे या गंभीर प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी सातत्याने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार तसेच अर्जुन टर्के, रंगनाथ दुधाटे, हनुमान ढगे, रवी जाधव, गजानन क्षीरसागर, मुदीराज, गोविंद चुडावकर, यशवंत वाघमारे, इमरान आणि धोत्रे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT