Chemical Laced Mangoes Pudahri
परभणी

Purna Fake Devgad Hapus | पूर्णेत केमिकलयुक्त ‘देवगड हापूस’ची विक्री; ग्राहकांची फसवणूक, आरोग्य धोक्यात

शहरात काही विक्रेत्यांकडून केमिकलच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या पिकवलेले आणि निकृष्ट दर्जाचे आंबे ‘देवगड हापूस’ म्हणून विकले जात असल्याचा प्रकार समोर आला

पुढारी वृत्तसेवा

Chemical Laced Mangoes Parbhani

पूर्णा : शहरात काही विक्रेत्यांकडून केमिकलच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या पिकवलेले आणि निकृष्ट दर्जाचे आंबे ‘देवगड हापूस’ म्हणून विकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असून त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.

कमाल टॉकीज परिसरात स्टॉल लावून आंब्यांची विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याकडून गौर येथील विधिज्ञ शेषराव पारवे यांनी देवगड हापूस आंब्याची एक पेटी खरेदी केली होती. पेटीतील आंबे बाहेरून आकर्षक आणि दर्जेदार दिसत होते. मात्र घरी नेल्यानंतर आंबे कापून पाहिले असता ते आतून काळवंडलेले आणि नासलेले असल्याचे आढळून आले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यासंदर्भात बोलताना शेषराव पारवे यांनी संबंधित विक्रेत्याविरुद्ध कारवाईची मागणी केली. यापूर्वीही अनेक ग्राहकांना अशाच प्रकारे केमिकलयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे आंबे विकून फसवणूक करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील इतर काही विक्रेतेही विविध संकरीत वाणांच्या आंब्यांना रासायनिक औषधांचा वापर करून कृत्रिम पद्धतीने पिकवत असल्याची माहिती ग्राहकांकडून दिली जात आहे. अशा आंब्यांचा रंग आकर्षक पिवळा असल्याने ग्राहक सहजपणे त्याकडे आकर्षित होतात. मात्र प्रत्यक्षात हे आंबे चवीला आंबट, निकृष्ट आणि रसायनयुक्त असल्याचा आरोप केला जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, रासायनिक पदार्थांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अशा विक्रेत्यांची तपासणी करून नमुने परीक्षणासाठी पाठवावेत आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

दुसरीकडे, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले गावरान आंबे विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांनाही या प्रकारामुळे फटका बसत आहे. उसाच्या पाचटीत किंवा पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांना बाजारात योग्य दर आणि ग्राहक मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT