परभणी : प्रख्यात शिक्षण व पर्यावरण तज्ञ सोनम वांगचुक हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ परभणीत शुक्रवारी (दि.१७) धरणे आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
नीट पेपर फुटीप्रकरणी अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रख्यात शिक्षण व पर्यावरण तज्ञ सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या १९ व्या दिवशीही केंद्र सरकारने दखल न घेतल्यामुळे सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ परभणीत धरणे आंदोलन करत वांगचुक यांचे उपोषण सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात देशातील अत्यंत भौगोलिक स्थिती असलेल्या लेह-लद्दाक भागातील थोर शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ, पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक मागील १९ दिवसांपासून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण करत असून केंद्र सरकारने या उपोषणाची दखल घेतली नाही, ही खेदाची व संताप जनक बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे. देशात सद्यस्थितीत अनेक भोंदू बाबा, तांत्रिक, मांत्रिक यांना राजाश्रय मिळत असताना एका शास्त्रज्ञाची अपमानकारक मानहानी व्हावी हे क्लेशदायक असल्याचे म्हटले आहे.
लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या नीट व महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या टीईटी पेपर फुटीचे सत्र अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डगमगल्याचे म्हटले आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा व यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने संवेदनशीलतेने विचार करावा. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे हे दुर्दैवी असून, वांगचुक यांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास देशभरातील तरुण व नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो असेही निवेदनात म्हटले आहे. केंद्र सरकारने वांगचुक यांच्यासोबत चर्चा करून त्यांचे उपोषण तत्काळ सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.
धरणे आंदोलनात माजी आ. विजय गव्हाणे, प्राचार्य विठ्ठल घुले, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ, माधुरी क्षीरसागर, प्रा. प्रवीण कनकुटे, कॉ. लिंबाजी कचरे पाटील, कॉ. शिवाजी कदम, डॉ. सुनील जाधव, सोनाली देशमुख, डॉ.सुनील मोडक, सुहास पंडित, सिद्धार्थ मोगले, प्रा. चंद्रकांत गांगुर्डे, सारंग साळवी, प्रा. रफिक शेख, मोहम्मद झिशान, सुधाकर कोंढरे, दिलीप जोंधळे, अशोक पुंड, एन. आय. काळे, व्हि. एम. सोनटक्के, नितीन सावंत, त्र्यंबक इंगळे, एन.जी. खंदारे, एस. बी. जाधव, रमेश घनघाव, शेख अलीम, एल. आर. साबळे, संतोष धोत्रे, सोपान लोंढे, अनिल रसाळ व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.