नसरापूर प्रकरणाच्या निषेधार्थ शहरासह जिल्ह्यात मूक मोर्चे pudhari photo
परभणी

Parbhani protest Nasrapur case : नसरापूर प्रकरणाच्या निषेधार्थ शहरासह जिल्ह्यात मूक मोर्चे

मानवत येथे ब्राह्मण महासंघ, सकल हिंदू समाज आक्रमक; परभणीत नागरिक संतप्त

पुढारी वृत्तसेवा

परभणी : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे निष्पाप चिमुरडीवरील अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने महाराष्ट्राच्या मनाला चिरफाड केली, या क्रूर कृत्या विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली. याचे तीव्र पडसाद सोमवारी (दि.4) परभणी शहरात उमटले, परभणीकरांच्या एकवटीतून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

संतप्त नागरीकांनी हातात फलक, डोळ्यांत संताप आणि मनात वेदना घेऊन नागरिकांनी घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. नराधमाला तत्काळ फाशी द्या, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

या हृदयद्रावक घटनेमुळे नागरिकांत असुरक्षिततेची भावना तीव्र झाली, महिलां व लहान मुलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने अधिक ठोस पावले उचलावीत, अशीही मागणी यावेळी केली. अशा विकृत प्रवृत्तीला समाजात थारा नाही. केवळ निषेध करून भागणार नाही, तर कठोर कायदेशीर कारवाईतूनच याला आळा बसू शकतो, असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड यांनी व्यक्त केले. प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असल्याची माहिती मिळाली, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व पुरावे भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. मात्र संतप्त जनतेच्या भावना पाहता, यात न्यायाची गती वाढवणे ही मोठी कसोटी ठरणार आहे.

मानवतला डोळ्यांत संताप, मनात वेदनेसह नागरिक उतरले रस्त्यावर

मानवत : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षीय निरागस चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असताना, मानवत शहरात सोमवारी (दि.4) संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व सकल हिंदू समाजाच्या संयुक्त विद्यमाने भव्य मुकमोर्चा काढून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासह न्यायव्यवस्थेने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली.

श्री योगानंद महाराज स्थापित दत्त मंदिरातून मुकमोर्चा निघाल्यानंतर हातात निषेधाचे फलक, डोळ्यांत संताप आणि मनात वेदना घेऊन नागरिक शांततेत मोर्चात सहभागी झाले होते. मुख्य बाजारपेठ मार्गे निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात येऊन संपन्न झाला. संपूर्ण मार्गावर वातावरण शोकमग्न असूनही संतापाने पेटलेले होते. याप्रसंगी ॲड.अनिरुद्ध पांडे आणि कीर्ती कत्रुवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. अशा विकृत प्रवृत्तीला समाजात स्थान नाही. आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

प्रास्ताविक प्रसाद जोशी यांनी केले. शुभ्रा दलाल यांनी पीडित बालिकेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर केले. हे निवेदन ग्राम महसूल अधिकारी सागर मस्के यांनी स्वीकारले. निवेदनात आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देणे, पीडित कुटुंबासाठी विशेष सरकारी वकील नेमणे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुकमोर्चात शहरातील डॉक्टर, वकील, महिला, तरुणाई तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. शांततेत काढण्यात आलेल्या मोर्चातून समाजातील असंतोष स्पष्टपणे व्यक्त झाला. निर्दोष बालिकेवर झालेल्या या क्रूर अत्याचारामुळे मानवतकरांच्या मनात संतापाची लाट उसळली असून, न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT