पेठ शिवणी, पुढारी वृत्तसेवा : पालम तालुक्यातील पेठ शिवणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी येथील कॅशियर पदावर असलेले चंद्रकांत पुंडलिकराव फुले (वय 52) यांचा हौदामध्ये पडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. १३) पहाटे ४.३० च्या सुमारास घडली. पालम पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे. (Parbhani News)
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत पुंडलिक फुले मागील पंधरा वर्षांपासून पेठ शिवणी (ता. पालम) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी येथे कॅशियर म्हणून काम पाहत होते. ते सूतगिरणीमधील वसाहतीमध्ये राहत होते. रात्री ते घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने चंद्रकांत फुले यांच्या मोठ्या भावाला फोन करून कळवले होते. त्यानंतर त्यांनी पहाटे तीनपासून त्यांचा शोध घेत होत्या. पहाटे चारच्या सुमारास सूतगिरणी मधील पाण्याच्या हौदाजवळ त्यांचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळला.
चंद्रकांत यांचे मोठे बंधू धोंडीबा पुंडलिकराव फुले सकाळी 7 च्या सुमारास सुतगिरणीत पोहोचले. कामगारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पालम येथील सरकारी रूग्णालयात नेण्यात आला. पुढील चौकशी पोलीस हवालदार कोलमोड करत आहेत.